अतिरिक्त मोबाईल वापरामुळे (Brain Rot) ‘ब्रेन रॉट’ चा धोका.

आजच्या इंटरनेटच्या जगात स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात असणे ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे इन्स्टाग्राम, Youtube किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिल्स पाहण्यात तासनतास घालवतात. विचार न करता तासन् तास स्क्रॉल करत राहतात. काही वेळा अशा रिल्सचा किंवा व्हिडिओंचा आपल्यासाठी काहीच अर्थ नसतो. जर तुमच्या आजूबाजूला कोणी हे करत असेल किंवा तुम्ही स्वत: करत असाल तर कदाचित तुम्हाला ब्रेन रॉटचा त्रास होत असेल. ‘ब्रेन रॉट’ म्हणजे काय ? शब्दकोशात दिलेल्या अधिकृत अर्थानुसार, ‘ब्रेन रॉट’ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक आरोग्य काही प्रमाणात बिघडणे. ब्रेन रॉट ही आपल्या मेंदूची एक अवस्था आहे. या अवस्थेबद्दल तज्ञ सांगतात की जेव्हा एखादा व्यक्ती सतत सोशल मीडियावरील कंटेंट पाहत असतो. तेव्हा तो सतत त्याच कंटेंटचा विचार करत असतो आणि त्यामुळे व्यक्ती आपल्या मानसिक विकाराला बळी पडून आपल्या बुद्धीची विचार करण्याची क्षमता गमावतो. इथपर्यंतच मर्यादित नाही तर असा व्यक्ती मानसिक रित्या थकलेले असतात. 2024 मध्ये ऑक्सफोर्डने ‘ब्रेन रॉट’ या शब्दाची वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषणा केली. निरीक्षण केल्यास असे लक्षात आले , की पूर्वी एकच चित्रपट कितीही वेळा लागला तरी तो पाहण्याची लोकांची तयारी होती. पण आता ‘वन टाइम वॉच’ मुव्ही अर्थात एकदाच पाहण्यासारखा चित्रपट आहे लेबल लावून मोकळे होतात. पूर्वी मालिकांमध्ये उद्या काय होणार याची उत्सुकता होती, पण आता वेबसिरीजचे सगळे एपिसोड पाहून झाल्यावरच फोन खाली ठेवला जातो. त्यासाठी रात्रभर जागरण करण्याचीही तयारी असते. इंटरनेटवर अनेक माहितीपर व्हिडीओ असूनही ते पाहण्याइतका लोकांचा संयम राहिलेला नाही. एखादी रेसेपी सुद्धा फॉरवर्ड करत बघितली जाते किंवा झटपट रील बघून समजून घेतली जाते. अनेकदा काय पाहण्यासाठी फोन हातात घेतला आणि काय बघत बसलो याचा ताळमेळ राहत नाही. जे काही पाहिले ते लक्षातही राहत नाही. पाहिलेल्या व्हिडीओचा उपयोगही होत नाही. अशा वेळी मेंदूवर आदळणारी माहिती ‘ब्रेन रॉट’ म्हणून संबोधली जाते. जी पाहून माहितीत भर पडत नाहीच, पण डोळ्यांना थकवा जाणवतो. हात, खांदे आखडतात. डोकं जड होते. नवीन काही करण्याचा उत्साह राहत नाही. याचा सर्वात मोठा धोका आहे तो विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष न लागणे, एका जागेवर स्थिर न बसणे, आपले मत अचूकपणे मांडता न येणे, त्यामुळे होणारी चिडचिड, मानसिक त्रास आणि कमी वयात जाड भिंगाचा चष्मा यामुळे मुलांचे मानसिक आरोग्यही धोक्यात आहे. ब्रेन रॉटचे काय दुष्परिणाम होतात?१) एकाग्रता कमी होते, दीर्घ काळ लागणारी कामं करण्याची इच्छा होत नाही. २) आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या विसरी पडतात, अनेकदा दैनंदिन कामंही नीटशी आठवत नाहीत.३) मोबाइलवर सतत स्क्रोलिंग करणं, सोशल मीडिया पाहिला नाही तर अस्वस्थ वाटणं, सतत ऑनलाइन राहणं यामुळे मेंदू अलर्ट मोडवर राहतो.४) स्क्रीन टाइम वाढल्याने प्रत्यक्ष संवाद करण्याची क्षमता अनेकदा हरवते. कुटुंबीयांनाही मेसेज किंवा चॅट करुन संवाद साधला जातो.५) झोपेवर परिणाम होत असल्याने मेंदूची नको असलेली माहिती काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम. त्यातून मेंदूची कार्यक्षमता कमी होते. असे दुष्परिणाम ब्रेन रॉटमुळे पाहण्यास मिळतात. ब्रेन रॉटमधून बाहेर येण्यासाठी काय उपाय करता येतात?१) आपल्या शरीराला सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे झोप. योग्य वेळेत झोप घेणं आणि शरीरासह मेंदूला आराम देणं महत्त्वाचं ठरतं.२) झोपण्यापूर्वी किमान १५ ते ३० मिनिटं आधी स्क्रीन पाहणं टाळणे, रोज किमान सात ते आठ तास झोप घेणं. झोपेच्या मधे जाग आल्यास मोबाइल न पाहणं३) स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं, दैनंदिन व्यायाम, वेळेवर जेवण अशी दिनचर्या आखून घेणं४) सोशल मीडिया, आभासी जग यापेक्षा आठवड्यातून किमान एकदा जवळच्या व्यक्तीची भेट घेणं, नातेवाईकांना भेटणं.५) मोबाइल किंवा कुठल्याही स्क्रीन ऐवजी पुस्तकं, वर्तमानपत्रं, इतर छंद यांमध्ये वेळ घालवणं. फिरायला जाणं. सायकलिंग करणं.असे सोपे आणि अगदी सहज शक्य असलेले उपाय योजल्यास ब्रेन रॉटमधून बाहेर पडता येतं. स्क्रीन टाइम ठरवून घेणे. मोबाईल हातात घेतल्यावर पाच मिनिटांनी आपण काय बघतोय आणि काय बघायचे होते यावर लक्ष देणे. डोळ्यांना विश्रांती मिळावी म्हणून दर अर्ध्या तासाने पाण्याचा हबका मारणे, आवडते छंद जोपासणे, चालायला जाणे, कामात गुंतवून घेणे, माहितीपर व्हिडीओ, लेख जाणीवपूर्वक शोधणे, पाहणे. यामुळे रील पाहण्याचे व्यसन कमी होईल आणि ब्रेन रॉटचा धोका टळेल.संदर्भ सुची :1) Oxford University Press2) National Institutes of Health (NIH)(.gov)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top